Saturday, May 15, 2021

आनंददायी.. आंबा...

#mango 
#cheesecake
#mangolassi
#mangofaluda
#mango #aamras


कधी.. भाजलेलं बोट गार पाण्यात बुडवलंय..?

पावलांना चटके बसत असताना गार पाण्याच्या टाकीत उतरलाय?

घाम पुसत असताना एसी ऑफिस मध्ये शिरलाय?

गड चढून धापा टाकत असताना मडक्यातलं ताक प्यायलाय?

पहिल्या पावसात डोळे मिटून मान वर करून भिजलाय?

 

 

हे सगळं करताना जे काही होतं.... 

ते मला आंबा खाताना होतं.. 

उन्हाळा मला आवडत नाही- उन्हाचे सूर्याचे सूर्यकिरणांचे फायदे मला पटवून द्यायचे प्रयत्न आईने केले लहानपणी- पण मला नाहीच आवडत ना सूर्य.. मला चंद्र आवडतो. आणि मला लहानपणी वाटायचं की सगळ्या आवडत्या गोष्टी चंद्रप्रकाशात बसून कराव्यात- किंवा पावसात!

पण आंबा पावसामुळे पिकत नाही खराब होतो हे कळल्यावर मला ब्रेकअप झाल्याचा फील आला होता लहानपणी- माझी समजूत काढण्यासाठी आजोबांनी मला सांगितलं- ते फळ नीट पाहा. त्याचा रंग त्याचा गंध- नीट दोन्ही हातांच्या तळव्यात धर त्याला- बघ किती उष्ण फळ आहे ते- तुला वाटतं हे पावसामुळे तयार होत असेल..? संपूर्ण उन्हाळा आपल्या आत साठवतो आंबा म्हणून तो पिकतो, मधुर होतो- दु:ख पचवून काही माणसं जशी मृदू होतात इतरांसाठी-

आजोबा हुशार होते माझे- शेवटच्या वाक्यात खूप काही सांगून गेले- त्यांच्या म्हणण्यानुसार मी आंबा हातात धरला, आजच्या #millennial  भाषेत फील केला. आणि एक उबदार जाणीव आख्ख्या शरीरातून गेली. त्याचा तो सुरेख रंग, हलकेच तांबूस पिवळा केशरी सगळ्याचा मधला.. फारशा नितळ नसणा-या चेह-यावर जेव्हा हसण्यामुळे डोळ्यांच्या बाजूला चिरम्या पडतात त्या किती सुरेख दिसतात- तशा त्या आंब्यावर हसण्याच्या बारीक चिरम्या पडल्या होत्या.. आतला गर बाहेरूनही जाणवत होता. आणि कैरीचा अल्लडपणा मागे पडून आता तिशी पार केलेल्या स्त्रीचा चं मार्दव होतं त्या आंब्यात- माझी आजी म्हणायची तसं- रंजना म्हणजे कैरी.. आणि सीमा म्हणजे आंबा- (कोणाचं काय तर कोणाचं काय)...

आंबा हे फळ माझ्यासाठी सुखाची परमावधी आहे- न मागता मिळालेलं वरदान आहे..2009 साली आमसुत्र नावाची कतरिना ची जाहिरात आली होती. त्यात तिचं जे जे काही होतं ते सगळं माझं आंबा खाताना होतं. 



 वर्षभर मी दोन कारणांनी आंब्याची वाट पाहते- एक म्हणजे आख्ख्या उन्हाळ्याचा दाह सोसायची ताकद निव्वळ या आंब्याच्या येण्याने, सुगंधाने, घरात पेटीत फ्रीज मध्ये ताटात असण्याने मिळते. आणि दोन... याच्या नंतर माझा जिवलग पावसाळा येणार असतो. इतके वर्ष आंबा खाल्ला..  गावी गेल्यावर तर नाश्ता करायच्या ऐवजी पायरीच आंबा खा..  बिस्कीट खातो येता जाता किंवा टॉफी- तसं रायवळच खा.. असे प्रकार लहान असताना खुप केले. मोठं झाल्यावर आई बाबांनी अगं मस्त लागतात म्हणून तोतापुरी लंगडा अशा नावाचे आंबे सुद्दा खाऊ घातले. पण अहं! नाय नो नेव्हर! शेवटी काय आंबाच तो.. ही लंगडी सबब आहे- आणि तोतापुरी तर नावाइतकाच तोतया आहे. (हे माझं पर्सनल मत आहे. जो जे वांछील तो ते खावो...) केसर नावाचा सुद्धा एक आंबा मिळतो पण मला फक्त हे नाव आवडतं. केसर.. बाकी आंबा खावा तर फक्त आणि फक्त हापूस-

पायरी हा आंबा दुसरं तिसरं काही नसून दीपक तिजोरी चं फल रूप आहे असं मला वाटतं. साईड हिरो असावा तर असा... हिरोची सावली- पण पूर्णपणे हिरो नाही. त्याने हिरो म्हणून काम केलेले चित्रपट हिट नाही झाले.- हापूस आहे असं सांगून पायरी  खायला दिला तर जेवण सुद्दा फ्लॉप होईल. पण वाडवडील सांगतात पायरी हा रस काढायला उत्तम- रायवळ चोखून खावा, हापूस कापून.. अन पायरी रसाला.. ते काहीही असो, होम सायन्स केलेली मुलगी स्थळ म्हणून आलेली असताना सुद्धा आपल्याला सिरीयल साठी ऑडीशन दिलेल्या मुलीचाच मोह पडावा..तसं होतं पायरीच्या बाबतीत.  वडीलधारे काहीही सांगोत, हापूस तो हापूस... रस काढा, शिरा बनवा, नारळाच्या चवात टाकून आंबा-नारळाच्या वड्या करा.. किंवा आम्ही पूर्वी करायचो तशी दाट, थंडगार, मुलायम mango lassi करा... 

आंब्याचा गर, दुधाची साय, दुध पावडर, वेलची आणि गुलाबपाणी असं सगळं छान एकजीव करून केलेली कुल्फी तर मस्ट आहे.. आंब्याचं लोणचं खाल्लं की त्या आंब्यांचं कौतुक वाटतं की कसा तिखटासोबत सुद्धा जुळवून घेतो. नुसता जुळवून नाही घेत, गुणी बायकोसारखा वर्षानुवर्षं नांदतो, मुरत जातो.. मऊ मऊ गार आणि खाताच विरघळणारा mango चीझ केक-


 आठवला तरी बर्थडे असल्या चा फील येतो. मैत्रिणीच्या वाढदिवसाला केक नाही मिळाला म्हणून दुध आणि खवा आटवून आटवून त्यात आमरस खालून केलेली आंबा मलाई बर्फीचा मिल्क केक अजून आठवत राहतो.. (आणि वाढलेल्या कॅलरीज पण आठवतात).

 सध्याच्या काळात बाहेर पडता येत नाही त्यामुळे जास्तच असेल पण आमच्या मुंबईच्या हाजी अली ज्यूस सेंटर मध्ये मिळणारं mango फ्रेश क्रीम नावाचं magic मिस करतेय मी- गाडीला टेकून समोरची माशूका मुंबई बघत, कानात रेहमान ची गाणी लावत, आणि हातात हे फ्रेश क्रीम- जन्नत चं तिकीट!!! Aah! वो भी क्या दिन थे-

बाकी घरीच रहायचं तर, उन्हाळ्यात रोज खाऊ शकते असं जेवण म्हणजे आमरस पुरी- 


अगदी रोज पुरी नसेल खायची तरी गरमागरम तव्यावरून ताटात आलेले मऊसूत फुलके आणि फ्रीज मधून नुकता काचेच्या बाउल मध्ये आलेला आमरस... मी हे रोज खाऊ शकते. एकदा खाऊन बघा. (अर्थातच खाल्लं असणार). भाज्या तर जाऊचदे, फिश बिश पण सोडून द्याल-

अर्थात असं म्हणून फिश सुटत नाही- पण फिश आणि आंबा असं कॉम्बिनेशन मिळणार असेल तर? वाचून चक्रावून जाऊं नका, हे काही नवीन fad नाहीये. माझ्या आईची आई, माझी आजी- (ती रंजना सीमा वाली वेगळी ती बाबांची आई- आपल्या कडे दादी नानि सारखे दोन शब्द का नाहीत आजीला) तर माझ्या आईची आई, बाठ्वणी नावाचा सुरेख पदार्थ करायची- आंब्याचा (याला मात्र रायवळ किंवा कमी गोड आंबटसर आंबेच हवेत) बाठा गरासकट घ्यायचा, करंदी (कोलंबीची धाकटी बहीण) किंवा कोलंबी नेहमी करतो तशीच कालवण म्हणून करायची. म्हणजे कांदा परतून घ्यायचा.  त्यावर आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट हळद मसाला याने न्हाऊ माखू घातलेली कोलंबी परतून घ्यायची- त्याला पाणी सुटू द्यायचं.. आणि मग जास्तीचं पाणी घालायच्या आधी, फक्त त्यात कोकम ऐवजी हा बाठा टाकायचा- एकत्र नांदू लागले की मग बेताचं पाणी घालायचं- आणि वाफ येऊ द्यायची-


त्या गोड आंबट बाठ्याचा रसात ती कोलंबी अशी काही मुरडते, फारच खतरनाक लागते- भात आणि बाठ्वणीचा हा रस्सा... म्हणजे दुपारच्या झोपेची गोळी...

आणि आता सगळ्यात शेवटी मी गेल्या वर्षी अनुभवलेला आंबा फालुदा... यासाठी एक उंच ग्लास मात्र मस्ट आहे. आंब्याच्या गराचे रसाळ तुकडे, त्यावर शुभ्र vanilla आईस्क्रीमचा छोटा स्कूप, थोडा आमरस, त्यावर सब्जा, लुसलुशीत शेवया, मग पुन्हा आमरस , पुन्हा एक मोठा आईस्क्रीमचा गारेगार स्कूप आणि आंब्याचे तुकडे, त्यावर पिस्ता काजू बदाम केशर सगळ्याची मुक्तहस्ते पखरण- उन्हाळा यावर संपावा- दर वर्षी यावा.. रसाळ सुरेख आंब्यासकट यावा... 

 



आशा ताईंच्या प्रेमात आहे मी. तरीही कान धरून हेच म्हणेन की आंबा personify केला तर एकच म्हणता येईल. की आंबा म्हणजे लता दीदींचा आवाज- रसाळ, मधुर.. दैवी .. स्वर्गीय... एकमेवाद्वितीय-

तुम्ही कधी शांत रात्री चांदणं पडलं असताना इयरफोन लावून रहे न रहे हम किंवा कभी तो मिलेगी कही तो मिलेगी बहारो की मंझील  ऐकलंय...?

बाहेर पाऊस पडत असताना रिमझिम गिरे सावन ऐकलंय?

कुणाशीच बोलू नये असं वाटत असताना बीती ना बितायी रैना लावलंय?

हे सगळं ऐकताना जे काही होतं....

ते मला आंबा खाताना होतं..



..................................................................












Monday, May 3, 2021

जीने के बहाने मिल गये

 

माणसाने आपल्यातली एक तरी कला नेहमी जिवंत ठेवावी..  मग एक वेळ येते, सगे सोयरे नातेवाईक पोरं बाळं शेजार पाजार सहकारी सहचारी कोणी कोणी सुद्धा सोबत नसलं तरीही ती कला आपल्याला जिवंत ठेवते....

माझ्या सासूबाईंच्या हाताला चव भारी- आणि ती एक गोष्ट- स्वयंपाक- पदार्थ करणे- त्या अन्नपूर्णेचा हात त्यांनी कधीही नाही सोडला.

आज आम्हाला कोणाला वेळ असला नसला तरी ती गोष्ट, ती कला, ती देवी त्यांना एकटं पडू देत नाही. पहिल्यांदा म्हणून त्यांनी नानकटाई घरी केली. आणि शप्पत सांगते, मी आजवर खाल्लेली ही बेस्ट नानकटाई होती. कोणाला वाटेल त्यात काय मोठंसं.... नानकटाई काय आजकाल बायका वाईन सुद्धा घरी बनवतात-

पण मुद्दा नानकटाईचा नव्हताच की! मुद्दा तर त्या कलेचा होता जिचा हात आपण सोडू नये आणि जी आपला हात सोडत नाही..

खूप भारी.. खाऊन आम्हाला आणि आम्हाला डोळे मिटून खाताना बघून त्यांना खूप मजा आली.. बनाते रहो खिलाते रहो.


# #happiness 

melting moment

 

मस्का खारी सारखं असावं प्रेमात पडल्यावर... तिचा स्वतःचा एक आब आहे एक मर्जी आहे. बिस्किटा सारखी ती पूर्णपणे विरघळून जात नाही चहात. ती चहासोबत छान लागते हे जितकं खरं आहे तितकीच ती आपली आपली एकटीच मनस्वी सुद्धा छान असते. असली सोबत तर मस्त नाहीतर तिची स्वत:ची एक स्पेस आहे. स्वतःच्याच कंपनीला बोअर न होणाऱ्या माणसांसारखी... विरघळून जाण्याचा बिस्किटी इनोसन्स नाई राहिला आपल्यात.  बाकी महापुरुष म्हणून गेलेच आहेत-  जमाना है बदला मोहब्बत हे बदली घिसेपिटे व्हर्जन्स मारो अपडेट...
#गंमत #काहीबाही #teatime #khari



fo chi po

फो ची पो- एक ऑथेंटिक चायनीज डिश-

लहान असताना आमच्या मध्यमवर्गीय (आणि आम्हाला बोअरिंग वाटणा-या) आयुष्यात काहीतरी स्पाईस यावा म्हणून मी आणि माझा भाऊ Abhijeet छोट्या छोट्या भाबड्या आयडीयाज लढवायचो- त्यातली अजूनही आठवणारी आयडिया म्हणजे- आज नाश्ता काय आहे या प्रश्नाला फो ची पो किंवा फो चा भा असं म्हणून एक्साईट व्हायचं- (आत्ता पर्यंत सगळ्यांना माहित झालेलं) फो चा भा म्हणजे फोडणीचा भात- आणि फो ची पो म्हणजे फोडणीची पोळी- (आता सीकेपी झाल्या मुळे- चपातीचा चुरा/फोडणीची चपाती) एका (चायनीज) नाव बदला मुळे लगेच काहीतरी वांगटुंग पिंग पिंग खाल्ल्यासारखा फील यायचा- आणि उगाच स्तर (जेवणाचा आणि आमचा) उंचावल्याची स्टुपिड फिलिंग यायची-

मधल्या काळात एकटं रहात असल्या मुळे चपात्या/पोळ्या दोनेकच बनवायचे- मग नंतर सगळ्यांसाठी सुद्धा मोजूनच करायची सवय लागली- शिवाय शिळं खायची आई/सासू आणि तत्सम पिढीची परंपरा सुद्धा मोडायची होती. जेवढं लागेल तेवढंच बनवू पण तुम्ही सुद्धा शिळं खाऊ नका तब्येतीला चांगलं नसतं ते असं प्रेमाने दोघीनन समजावलं आणि नेमकं त्यांनी ते ऐकलं सुद्धा- त्या नादात उरलेल्या चपातीचा हा खमंग चुरा मात्र हरवला-

आता तर डायेट (माझ्या आईच्या भाषेत fad) सुरु झालं- (त्याचा रिझल्ट दिसल्यावर मात्र तिचा विरोध मावळला) पण त्यात गहू आणि पर्यायाने चपातीला फाटा दिल्या मुळे हा खमंग पदार्थ माझ्या ताटातून गायबच झाला- पण आज खूप काळाने सुगरण सासूबाईनी हा रुचकर फो ची पो बनवला. सगळंच आठवून गेलं- (डायेटचा मात्र विसर पडला) काल केलेल्या घमासान व्यायामाला आठवून ठरवलं आज पायजेल ह्ये माला!! मी खानार! मधल्या काळात जापनीज (भाषा आणि पदार्थ) शिकल्यामुळे चॉपस्टिकस कसे चालवावेत यात पारंगत मी, आज मन (आणि पोट) भरून माझा लाडका पदार्थ चॉपस्टिक्स नी खाल्ला. चायनीज आहे म्हटल्यावर चॉपस्टिक्सनेच खाल्ला पाहिजे ना-

आयुष्यात प्युअर आणि जेन्युईन आनंदाचे क्षण बालपणात राहून गेले हे खरंच आहे- कधीतरी मग त्याची अशी फोटोकॉपी समोर येते- आणि पुन्हा (तेव्हासारखं) स्टुपिड इमोशनल होतं मन-

Thanks a lot mom in law..(amma) 


#fochipo #childhood #chopstics




Sunday, June 7, 2020

कोशिंबीर ते salad! एक प्रवास...


स्थळ: आमचं जुनं घर.
काळ: मी १० वगैरे वर्षांची असतानाची- (म्हणजे साधारणत: १९९३ वगैरे)

आमच्या घरी टिपिकल कोशिंबिरी बनायच्या.. काकडीची कोशिंबीर- दाण्याचं कुट घातलेली, tomato कांद्याची कोशिंबीर- बारीक हिरवी मिरची चुरडून घातलेली, (एकदाच माझ्या भावाने उकडलेल्या बटाट्याची कोशिंबीर केलेली तर मला किती अप्रूप वाटलं होतं त्याचं-) आणि पंधरवड्यातून एकदा बनायची ती- दही घालून केलेली उकडलेल्या किसलेल्या बीटाची कोशिंबीर-

माझ्या दृष्टीने तेव्हा न खाण्यासारख्या खूप गोष्टी होत्या जगात... बडी लंबी लिस्ट थी मेरी- पण त्यात सगळ्यात पहिल्या क्रमांकावर होती ही बीटाची कोशिंबीर- मला ती खाऊन आत काहीच घडायचं नाही- (आजही माझा हा क्रायटेरिया ब-याच गोष्टीना आहे, एखादी फिल्म, एखादा पदार्थ, एखादं गाणं एखादि व्यक्ती.. access करून माझ्या आत जर काहीच उलथापालथ झाली नाही, माझ्या आत टिंग सुद्धा वाजलं नाही तर ती गोष्ट फार लवकर मनाच्या रिसायकल बिन मध्ये जाते माझ्या कडून. आणि सहजा सहजी restore होत नाही ती मूळ जागी). तर- बीटाची कोशिंबीर- माझी आई फार चांगलं जेवण करते. ती कोशिंबीरही चांगलीच करायची- पण मला मात्र ती गणिताच्या पेपरइतकीच अप्रिय होती. ज्या दिवशी आई ती कोशिंबीर  करायची, मी ती खावी म्हणून अजून एखादा माझ्या आवडीचा पदार्थ करायची- आणि किमान वाढलेली कोशिंबीर तरी खा तरच तो पदार्थ मिळेल असा भाबडा प्रयत्न असायचा त्या माउलीचा.
त्याही दिवशी घरात बीटाची कोशिंबीर केलेली होती. आणि माझ्या आवडीच्या बटाटयाच्या काच-या होत्या केलेल्या- (simplicity at its best म्हणजे काय असं कोणी विचारलं तर मी बटाटा काचरा आणि वरण भात असा मेनू सांगेन) एक पोळी (चपाती) खा त्या बीटाच्या कोशिंबीरीसोबत- मी गरमागरम भाजी आणतेच आहे असं सांगून आई भाजी परतायला आत निघून गेली.
माझ्या समोर एक पोळी- आणि आयुष्यातला सगळा रस संपलेल्या माणसासारखी ती बीटाची कोशिंबीर... मी एक घास खायचा प्रयत्नही केला, शप्पत! पण नाहीच, जणू काही ती कोशिंबीर म्हणजे एक माणूस आहे आणि आयुष्यभर आता याच्या सोबत राहावं लागणारे इतक्या अनिच्छेने मी ताट आणि ती कोशिंबीर दूर सारली-  झाली का गं खाऊन? आईचा आतून आवाज आला-
आता एकच शेवटचा पर्याय होता... आणि त्या काळी माझ्या समोरचे जे शेवटचे पर्याय असायचे ते बहुतेक वेळा वेडगळपणाचे धाडसाचे आणि पकडले गेले तर मार खायला लागतील अशा लेव्हलचेच असायचे... मी समोर पाहिलं, त्या काळी आम्ही तीस-या मजल्यावर राहायचो- आणि आमची खिडकी बिल्डींगच्या मागच्या बाजूला यायची.. जिथे खाली नुसतीच दगडमाती होती, आजच्या सारख्या posh टाईल्स वगैरे नव्हत्या. त्यामुळे नकळत मी उठले, हिंमत करून खिडकीशी गेले, ताटातली पोळी तोंडात कोंबली, आणि खाली वाकून न पहाता  कोशिंबीर- सगळीच्या सगळी कोशिंबीर सरळ खाली फेकून दिली..
खालच्या दगड मातीत ती कोशिंबीर सामावली जाईल, धरणी माता त्या कोशिन्बीरीला आपलं म्हणेल याची मला पूर्ण खात्री होती. इतक्यात आई बाहेर आली, आणि मी ती कोशिंबीर टाकताना त्या रसाने माखलेली बोटं चाटत तिला म्हणाले- संपवली बरं सगळी कोशिंबीर.. आता परत वाढू नकोस- तिच्या चेह-यावर स्माईल फुललं, आणि प्रेमाने ती आणते हं बटाट्याची भाजी असं म्हणतेय तोच खालून मोठ्याने आवाज ऐकू आला.
आमच्या सोसायटीत राहाणा-या मोरे काकू, (ज्यांनी लहानपणी माईक गिळला होता) त्यांच्या स्वाभाविक मोठ्या आवाजात आय माय उद्धारत होत्या. वरचे तिन्ही मजले बाल्कनीत आले होते आणि त्यांच्या गमभन चा अर्थ
समजून घ्यायच्या प्रयत्नात होते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांची नवीन लिंबू कलरची साडी पहिल्यांदाच पाण्यातून काढली होती आणि वाळत घातली होती. त्याच्यावर कोणीतरी गडद गुलाबी रंगाची बीटाची कोशिंबीर टाकली होती ज्यामुळे त्यांच्या साडीवर नवीन बाटिक प्रिंट सारखं डिझाईन उमटलं होतं .

त्यांच्या साडीवर पडलेल्या पदार्थाचं नाव ऐकून आईने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिलं- पुढचा प्रसंग तुम्ही imagine करू शकता. तमाम महाराष्ट्राला जिथे लिंबू कलरची साडी म्हटल्यावर बनवाबनवी आठवतो तिथे मला ही दुसरी लिंबू कलरची साडी आठवल्या शिवाय रहात नाही-
salads आणि माझं नातं हे या लेव्हलचं होतं. आज माझ्या डायेट मध्ये सलाड्स असतात, मला वेगवेगळ्या प्रकारची सलाड्स बनवायलाही आवडतात. मुळात त्यात काय गंमत असते ती मला कळली आहे. कारण कांदा tomato आणि गाजर बीट यापलीकडे खूप पदार्थ असतात आहेत ज्यांनी कsमाsलsss कोशिंबीरी आय मीन सलाड्स बनू शकतात हे मला कळलंय- पण हे सुद्धा सम एका दिवसात कळलं नाही- काही कार्यक्रम (कुकिंगचे- आभार- netflix) काही चित्रपट, काही पुस्तकं अशा सगळ्यांमधून ती गंमत कळत गेली. २००० नंतर मेयोनीज नावाच्या पदार्थाशी ओळख झाली. चीझ ही चीज दुर्मिळ वरून हौस आणि मग गरज कॅटेगरी मध्ये येत गेली... काळीमिरी दही आणि लिंबू प पलीकडेही सलाड्स मध्ये खूप काही addकरता येतं वरून, आणि त्या वरून addकरण्याला sauce नाही, ड्रेसिंग म्हणतात हे समजलं... आणि मग खरी धमाल येत गेली salads करण्यात. मग त्या निव्वळ कोशिंबीरी राहिल्या नाहीत. हा फक्त एका शब्दाचा, भाषेचा किंवा हाय क्लास- मिडलक्लास असा फरक नाहीये- सलाड्स हे आख्खं वेगळं कल्चर आहे. आणि त्यातला आत्ताशी २ टक्के भागच मला समजू लागलाय- अजून बाकीये ९८% या विचाराने मला अजून एक्साईट व्हायला होतं-

कळलेल्या २ टक्क्यात काय काय येतं तर- कडधान्यं वापरून सॉलिड सलाड्स बनवता येतात याची समज आणि प्रचीती! मुग मटकी वगैरे घालून फक्त मिसळ बनू शकते आणि पांढरे वाटाणे भिजवले की पाणीपुरीचा रगडा होतो, असं मानणा-यांनी एकदा ब्रेक घ्यावा.. आणि मोड आलेले मुग, कांदा, सिमला मिरची, ब्रोकोली आणि चिकन (व्हेज वाल्यांनो हे नका घालू, तरीही salad अमेझिंग बनेल.) एकत्र वाफवून घ्या, त्यावर मिरपूड कोथिंबीर व्हिनेगर चीलीफ्लेक्स आणि सैंधव (गुलाबी मीठ/काळे ) घाला आणि हातानी कुस्करून घ्या. चवीपुरता चाट मसाला टाका आणि व्हिनेगर नसेल तर सरळ लिंबू पिळा.. पोळी/चपाती भाजी भात आमटी विसरून जाल.. यात मुगा ऐवजी वाफवून शिजवून घेतलेले रगड्याचे वाटाणे टाकले आणि ब्रोकोली ऐवजी tomato add केला की झालं. बहार!




दुसरं एक समजलं ते म्हणजे हे ड्रेसिंग प्रकरण- मक्याचे दाणे, उकडलेली अंडी (optional) कुस्करून, वाफावलेलं चिकन (optional) त्याचे पातळ उभे पीसेस  करून,कांदा, सिमला मिरची आणि मश्रुम्स(हे चिकन सोबत सुद्धा होऊ शकतात किंवा व्हेज वाल्यांना चिकन ऐवजी सुद्धा वापरता येतील) या सगळ्याना एका काचेच्या बाउल मध्ये घ्यायचं- ४ चमचे सोया sauceएक चमचा व्हिनेगर, सैंधव चिली फ्लेक्स आणि पांढरे तीळ असं सगळं मिक्स करायचं आणि दोन्ही हातांनी या सगळ्या मंडळीना चोळायचं.. सगळे छान marinate झाले की कोथिंबीर वरून चिरून टाकायची आणि चमच्याने ढवळून घ्यायची- याचा एक बाउल खाल्ला तरी तुमचं डिनर होऊन जाईल. 

ड्रेसिंग करायचं म्हणजे दर वेळी व्हिनेगर आणि चिली फ्लेक्स सारख्याच गोष्टी पाहिजेत असं काही नाही- एकदा एका बाउल मध्ये दही घेतलं- घट्ट वालं दही. एक चमचा पाणी (किंवा दह्याला अंगचं पाणी सुटतं) घालून ते चांगलं फेटून घेतलं, त्यात द चीज क्युब्ज किसून घातले आणि चिमूटभर मीठ घालताना लसणाच्या २ पाकळ्या सुद्धा किसून घातल्या, चिमुटभर मिरपूड. आणि ढवळलं. काकडी पासून कोबी पर्यंत ज्या भाज्या हाती लागल्या, कच्च्या खाता येतील याची खात्री वाटली त्या मस्त चिरून त्यावर हे दही चीज लसूणचं ड्रेसिंग ओतलं. तान्ह्या बाळाला न्हाऊ माखू घालतो तसंत्या सगळ्या भाज्यांना मस्त न्हाऊ घातलं या ड्रेसिंग ने. ते कालवून झाल्यावर बोटं मस्त चाटून पुसून स्वच्छ केली.. त्या  दिवशी बाजारातल्या मेयोनीजने हार पत्करली..... try this people! its total madness!




रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलं की काही वेळेस salad bar दिसतो आणि लगेच कुतूहल THATS MY QUE म्हणत जागं होतं. त्या सगळ्या प्रकारात एक कोल्ड salad नावाचा प्रकार असतो. माझ्या आईने वाचलं तर ती ओरडलेच मला, की भाज्या नाशिवंत असतात त्या एक तर आधी पासून कापणार आणि वर त्या कसली कसली ड्रेसिंग घालून थंड करत फ्रीज मध्ये ठेवणार? छे! सगळी पोषण मूल्यं मारून टाकलीत तुम्ही वगैरे- पण काही गोष्टी पोषण मुल्यांपलीकडे असतात, हे मला मान्य आहे. तसंच हे कोल्ड salad. तुमच्या आवडत्या कच्च्या भाज्या म्हणजे काकडी सिमला मिरची टोमटो मटार कोबी कांदा मक्याचे वाफवलेले दाणे ( आणि आवडत असल्यास वाफवलेल्या चिकनचे तुकडे किंवा उकडलेल्या अंड्याचे स्लाईस) याचा प्रत्येक एक एक थर लावा एका  मोठ्या बाउलमध्ये- (काचेच्या- त्यात गंमत आहे) आणि मध्ये मध्ये मेयो किंवा चीज किंवा मी आत्ता दिलेलं दही लसूणचं ड्रेसिंग घाला, म्हणजे एक लेअर काकडीचा एक मोठी पळी भरून ड्रेसिंग. मग दुसरा थर tomato. पुन्हा एक पळी ड्रेसिंग मग मका.. असं करून हे सगळं फ्रीज मध्ये ठेवा.. थंड गार झाल्यावर मोठी पळी खुपसा आणि बिर्याणी कशी वाढून घेतो तसं जास्तीत जास्त लेअर्स घेत त्या सगळ्याची एकत्रित चव डोळे मिटून अनुभवा...



एरव्ही सगळ्याच पदार्थांमधून तेल पोटात जातंच म्हणून कोशिबीरीत तेल नको असं आपलं आहारशास्त्र सांगतं. पण कधी कधी चमचाभर olive oilने खूप गंमत आलेली चाखली आहे मी- वाफवलेला मका, आलं लसून मश्रुम्स वाफवलेले छोटे/मिनी बटाटे पातीचा कांदा आणि सुकी लाल मिरची चमचा भर olive oilवर परतून बघा. धमाल येते. ज्यांना व्हेज खायचा कंटाळा येतो (म्हणजे माझ्या सारखे) त्यांनी अजून एक चमचा तेलात एक ऑम्लेट करावं आणि हातानी कुस्करून यात add करावं. जन्नत! ज  न्न  त... प्लीज हे ट्राय करून बघा-



फळांची सुद्धा अशा प्रकारे सलाड्स बनतात- (दुध किंवा कस्टर्ड पावडर घालून आपण जे बनवतो ते नाही) पण मी अजून त्या वाटेला गेले नाहीये.  बाकी माझं सगळ्यात आवडतं सलाड म्हणजे चिकन mixed with veggies सलाड. त्याचा फोटो देते. म्हणजे त्यात काय घातलंय हे कळेलच तुम्हाला. जी काही ड्रेसिंग्ज मी लिहिली त्यातलं कोणतंही ड्रेसिंग वापरून हे सलाड बनवू शकतो.



रेड वाईन व्हिनेगर, रम sauce, फिश sauce, पीनट बटर, avocado, quinoa, zucchini tuna फिश salad पास्ता salad या सगळ्या मंडळीना अजून आजमवायचं आहे मला..  पण मला आनंद आहे की सरकत्या वर्षांनी मला किमान कोशिंबिरीवरून salad मध्ये प्रमोशन मिळवून दिलं. २% का होईना ज्ञान दिलं, नवीन प्रयोग करायची नवीन सलाड्स चाखायची उर्मी दिली. आणि ......
.............

त्या  बीटाच्या कोशिंबिरीपासून कायमची सुटका करून दिली....
........................................................................


Monday, June 1, 2020

दिवस ओल्या पाकळ्यांचे....



दिवस ओल्या पाकळ्यांचे, जाणीवांना गंध ओले..
गुरूने (ठाकूर) लिहिलेल्या काही नितांतसुंदर गाण्यांपैकी माझं आवडतं गाणं- हे आठवायचं कारण म्हणजे माझा यंदाच्या उन्हाळ्यातले सगळे दिवस.. गुलाबाच्या पाकळ्यांचे झाले आहेत.
नाही नाही, मला रोज कोणी गुलाबाची फुलं पाठवत नाहीये. पाठवणारच असेल कोणी तर नोंद करून घ्या मला निशिगंध/गुलछडी पाठवली तर जास्त आवडेल. गुलाब हे माझं आवडतं फूल नाहीये. कधीच नव्हतं. कारण एकच, अत्यंत कॉमन फूल आहे हे. मला पर्सनली काही पंगा नाहीये गुलाबा सोबत. त्याच्या पाकळ्या, त्याचे रंग, त्याचे गंध.. सगळंच अत्यंत मोहक असतं. रुमी ने तर गुलाबा वर इतकं काय काय लिहून ठेवलंय- पण तरीही.. माझा जीव कायमच अनंताच्या फुलात अडकलेला.. मी अजूनही वाट बघतेय valentine day ला कोणी अनंताचं फूल देणारा समोर येईल का..? जोक्स अपार्ट, मुद्दा इतकाच की गुलाबा बद्धल मला ओढ नाही.
पण एखादा माणूस आवडत नसला तरी त्याच्या कलाकृती आवडतातच की आपल्याला... गुलाबापासून बनणारं अत्तर, त्याच्या पाकळ्या चुरडून तयार होणारा मुरलेला गुलकंद, गुलाबाचा इसेन्स असलेलं, साउथ बॉम्बेच्या रेस्तराँ मधलं पिंक कॅलिडोस्कोप नावाचं कॉकटेल, गुलाबपाणी.. सगळंच मला आवडतं... 
पण या उन्हाळ्यात मला एक नवा शोध लागला, शोध मला लागला, गोष्ट तिथल्या तिथेच होती. (म्हणजे मी invention केल्याच्या थाटात म्हटलं  बेसिकली its a discovery. ती म्हणजे rose syrup. 
मी लहान असताना घरात बाहेरची रेडी टू मेक पेयं आणायला आई बाबा नाखूष असायचे. त्यामुळे जसं रसना घरात आलं नाही तसं एक रूहअफजा नावाचं पेय सुद्धा कधी येऊ शकलं नाही घरात. वास्तविक मी अत्यंत फिल्मी असल्याने मला त्याचं नावच इतकं आवडायचं. रूहअफजा.....! गुलबकावली नावाच्या एका फुलाची राजकन्या राजपुत्र टाईप्सची गोष्ट मी लहानपणी वाचली होती, मला नेहमी वाटायचं की गुलबकावलीच्या फुला पासून बनवत असतील हे रूहअफजा. काय रुह्दार नाव आहे. आणि जाहिरातीत दिसणारा त्याचा तो मखमली पाणीदार लाल रंग.. नुसतं बघूनच वाळा टाकलेल्या माठातल्या गार पाण्याचा फील यायचा घशाला... very earthen yet royal. 
तर.... या उन्हाळ्यात मला माझ्या शेजारणीने तिने बनवलेल्या  rose मिल्कशेक फोटो काढायला घरी बोलावलं. फोटो काढून झाल्यावर अगत्याने ते प्यायला सुद्धा दिलं. त्यात १ ग्लास  दुध होतं,एक स्कूप vanilla ice cream होतं २ चमचे rose syrup  आणि सब्जा होता.



आजवर मला या सब्जा बद्धल सुद्धा भयंकर अवघडलेली फिलिंग होती .. भिजवल्यावर ते असं काही गिळगिळीत दिसतं की त्याचे गुणधर्म लक्षात ठेवायची माझी इछाच संपून जायची- पण तिने दिलेल्या रोझ मिल्कशेक मध्ये तो सब्जा असा काही मिसळून गेला होता जणू एखादी बरी न दिसणारी पण अत्यंत गुणी सून चांगल्या तालेवार घराण्यात सहज खपून जावी. ते अभूतपूर्व पेय प्यायल्यावर मी तिला रेसिपी विचारली तिने सांगितली. आणि mapro चं हे rose syrup ही आणून दिलं. आधी मी न चुकता तिने सांगितलेली रेसिपी बनवली सुद्धा. फारच विशेष झाली होती ती.

पण मग एक दिवस मी ते rose syrup बाहेर काढलं आणि गारेगार rose syrup २ चमचे ग्लासभर थंड पाण्यात मिसळलं... भयंकर उकडत होतं, कोलंबीची खिचडी करायचं वरकरणी साधं वाटणारं किचकट काम मी करत होते. उकाडा आणि त्यातून येणारा घाम नकोशा सहप्रवाशासारखे अंगलट येत होते.. मी कानातल्या हेडफोनवर rainy jazz https://www.youtube.com/watch?v=DSGyEsJ17cI लावलं. आणि हे गारेगार गुलाबाचं सरबत प्यायले....




त्याच्या एका घोटासरशी मी त्या किचन मधून बाहेर पडले.. रखरखीत वाळवंटाचा wallpaper जाऊन अचानक rainforest चा स्क्रीनसेव्हर यावा तसं काहीसं झालं. जाणीवा सुखावल्या, मनाने मी कधीच न प्यायलेल्या रूहअफजाच्या चवीजवळ पोचले, हो, मी न प्यायलेलं रूहअफजा नावाचं देखणं पेय याच चवीचं असणार. क्षणभर वाटलं आपण गुलबकावलीच्या फुलापाशी उभे आहोत.. आणि दुर्मिळ असं ते फूल अखेरीस आपल्या हातात आलं आहे.....
त्यांनंतर मी काय खिचडी बनवली किती शिट्ट्या घेतल्या, मी काय जेवले माहित नाही. पण मी, माझं mapro चं हे rose syrup आणि पाणी घालताच तयार होणारं गुलबकावली नावाचं हे सरबत यात माझा उरलेला सगळा उन्हाळा  सरला आहे... 
इतके वर्ष उन्हाळा सुरु झाला की मी निव्वळ आंबा या एका जादुई किल्लीचं बोट धरून जाणिवांच्या प्रवासाला निघून जायचे. 
आता माझ्याकडे माझं गुलबकावली चं फुल, माझं गुलाबाचं सरबत आहे.

https://www.youtube.com/watch?v=DSGyEsJ17cI

#rose #rosesyrup #drink #coolers #namakswaadanusaar 

Sunday, May 31, 2020

नमक ... स्वाद अनुसार...

फूड .. पदार्थ... खाना... जेवण... चव.. रसना.. गंध..

स्वयंपाक करायला, रांधायला मला फार आवडतं. आयुष्यभर करत राहू शकेन अशा काही गोष्टीतली ही एक गोष्ट... जिंदगी ना मिलेगी दुबारा मधली कतरिना एका सीन मध्ये हृतिकला म्हणते तसं- under water rehna.. is like..  a meditation...  माझ्या साठी स्वयंपाक करणं हे उत्तम गाणं ऐकणं, पेंटिंग करणं, ध्यान करणं किंवा निसर्गाच्या एखाद्या भव्य रूपात हरवून जाण्यासारखं आहे..

मग गडबड काय आहे? तशी काहीच नाही- पण असं नसतं.. गडबड तर असतेच.. असलीच पाहिजे..
तर गडबड ही आहे की माझा हात सढळ आहे...
म्हणजे केशर सुद्धा असं पडतं हातून जणू वेलची पूड आहे. स्वस्त, सहज हाताशी असल्यासारखं...
साखरेचा गोडवा स्वभावातला असल्या सारखा अंमळ जास्तीच असतो..
तिखट पदार्थ सुद्धा नाकावरच्या सतत वस्तीला असणा-या रागासारखा झणझणीत...
हे सगळं खपून जातं...
खरी गोची मिठाची होते...
सगळंच सढळ हाताने पडतं आणि खाणारे कौतुकाने खातात, हा अजब न्याय वर्तुळाचा मिठाला लागू कसा होईल-
मिठ तुम्हाला सवलत देतं, कमी पडलं तर वाढवता येतं-
पण जास्त पडलं तर दरवेळी सांभाळून घेतंच असं नाही-
या जास्तीच्या मिठाने अनेकदा माझी फजिती केली आहे. फक्कड जमून आलेल्या माझ्या स्वयंपाकाचा माज उतरवला आहे. वरकरणी खमंग खरपूस चवदार दिसणा-या पदार्थाला  काय भुललासी वरलिया रंगा म्हणत माझी जागा दाखवून दिली आहे.
आणि हेही शिकवलं आहे, की स्वयंपाक असो सोहळा, पक्वान्नं असोत की नाती, दुध असो की उत्साह- उतू जाऊन चालत नाही.. स्वत:च्या आंतरिक उर्मीवर, देण्याच्या देऊन टाकण्याच्या उधळून टाकण्याच्या स्वभावावर ताबा हवा...
नमक तो चाहिये.. मगर....... स्वाद अनुसार......

स्वयंपाक करण्याच्या माझ्या आवडीला आजपासून शब्दांकित करायला घेतलं आहे.   या ब्लॉगमध्ये रेसिपी मिळेल पण टिपिकल एक टीस्पून रवा चार टीस्पून तूप अशा पद्धतीने नाहीत.

त्या रेसिपीज का केल्या इथपासून करताना काय गंमत झाली इथपर्यंत सगळं असेल यात....
शिवाय फोटोजही असतील, बहुतेक मीच क्लिक केलेले...
कळेलच हळूहळू यात काय असेल.. पण आत्ता थांबते..
कारण....
आपलं ठरलंय... नमक.... स्वाद अनुसार....

आनंददायी.. आंबा...

#mango  #cheesecake #mangolassi #mangofaluda #mango  #aamras कधी.. भाजलेलं बोट गार पाण्यात बुडवलंय..? पावलांना चटके बसत असताना गार पाण्याच...